जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक स्ट्रोक संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील दर चार व्यक्तींपैकी एकाला आयुष्यात कधीतरी स्ट्रोक येण्याची शक्यता असते. भारतात २०१९ मध्ये सुमारे १२.९ लाख नवीन स्ट्रोक रुग्ण आढळले, तर सुमारे ६.९९ लाख मृत्यू स्ट्रोकशी संबंधित होते. या पार्श्वभूमीवर स्ट्रोकची पूर्वलक्षणे वेळीच ओळखण्यासाठी ‘बीफास्ट’ ही पद्धत उपयुक्त ठरते.
मधुमेह, रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. हृदयाच्या ठोक्यांतील अनियमितता, विशेषतः एट्रियल फायब्रिलेशन, तसेच झोपेत श्वासोच्छ्वासात अडथळे येण्याच्या विकाराचाही स्ट्रोकशी संबंध असल्याचे सांगण्यात येते.
‘बीफास्ट’ पद्धतीने लक्षणे कशी ओळखावीत?
स्ट्रोकची लक्षणे ओळखण्यासाठी पूर्वीपासून ‘फास्ट’ पद्धत वापरली जाते; मात्र त्यात काही लक्षणे लक्षात येत नाहीत. त्यामुळे ‘बीफास्ट’ पद्धत अधिक उपयुक्त ठरते. बी म्हणजे बॅलन्स : अचानक तोल जाणे, चक्कर येणे किंवा चालताना अडचण निर्माण होणे. ई म्हणजे आईज : अचानक दृष्टी कमी होणे, धूसर दिसणे किंवा एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे. एफ म्हणजे फेस : चेहऱ्याची एक बाजू लोंबकळणे किंवा हसताना चेहरा एका बाजूला वाकडा होणे. ए म्हणजे आर्म : एका हातात किंवा शरीराच्या एका बाजूला अचानक बधिरपणा जाणवणे. एस म्हणजे स्पीच : बोलताना शब्द अस्पष्ट होणे, बोलता न येणे किंवा दुसऱ्याचे बोलणे समजण्यात अडचण येणे. टी म्हणजे टाईम : यापैकी एकही लक्षण आढळल्यास वेळ न घालवता तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घेणे.
प्रत्येक मिनिट महत्त्वाचे; स्ट्रोक आल्यास काय करावे?
संशोधनातील अंदाजानुसार उपचार न मिळालेल्या इस्केमिक स्ट्रोकमध्ये दर मिनिटाला सुमारे १९ लाख चेतापेशी नष्ट होऊ शकतात. त्यामुळे उपचारांना होणारा विलंब कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूचा धोका वाढवतो. स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास ती नेमकी कधी सुरू झाली किंवा रुग्ण शेवटचा सामान्य अवस्थेत कधी होता, याची वेळ लक्षात ठेवावी. रुग्णाला खाण्यास किंवा पिण्यास काहीही देऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अॅस्पिरिनही देऊ नये, कारण स्ट्रोक रक्तस्रावामुळेही झालेला असू शकतो. लक्षणे काही वेळाने नाहीशी झाली तरी तातडीने तपासणी आवश्यक असते.
प्रतिक्रिया व्यक्त करा