शिंदेसेनेच्या नेत्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्याकडून पत्रपरिषदेत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेच्या सभागृहात उमटले. या घटनेचा निषेध करत उद्धवसेना, मनसे आणि काँग्रेसने सभागृह तहकूबीची मागणी केली. मात्र महापौर रितू तावडे यांनी चर्चेची मागणी फेटाळत सभागृहाचे कामकाज पुढे रेटल्याने संतप्त विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर महापौरांच्या दालनात विरोधकांनी महापौरांना घेराव घालून जाब विचारला.
सभागृहात काय घडले
सभागृह सुरू होण्यापूर्वी शायना एन. सी. यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान सहन केला जाणार नाही. शायना एन. सी. यांनी माफी मागावी. त्यांच्यावर पक्ष कारवाई करत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली.
मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी बाळासाहेब फक्त नावासाठी हवे आहेत का, असा सवाल करत सभागृहात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. एवढे मोठे प्रकरण घडूनही शिंदेसेना शांत का, असा सवाल काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी केला. शिवसेनाप्रमुखांबद्दल सगळ्यांच्या मनात आदर आहे. त्यांचा अपमान कुणी सहन करू शकत नाही. मात्र कामकाज थांबवता येणार नाही, असे सांगून महापौर तावडे यांनी सभागृह तहकूबीची मागणी फेटाळली. त्यावर विरोधकांनी महासभेत गदारोळ सुरू केला.
पेडणेकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले उभे राहिले. भाजप सदस्य त्यांना साथ देण्यासाठी पुढे सरसावल्याने विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. या गदारोळातच महापौरांनी पुढचे कामकाज पुकारल्याने सभात्याग करत विरोधकांनी बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
शायना एन. सी. यांना हटवण्याची मागणी
शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांना पदावरून हटविण्याची मागणी करत उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात जोरदार निदर्शने केली. मात्र या प्रकरणावरून उद्धवसेनेकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत उपमहापौर संजय घाडी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुत्व सोडल्यामुळे उद्धवसेनेची आज ही अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी शायना एन. सी. यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आमच्या भावना दुखावल्या असून केवळ माफीने हा विषय संपणार नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका पेडणेकर यांनी मांडली. तर शायना एन. सी. या पक्षाच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आहेत. मात्र त्यांच्याबाबत चुकीची माहिती देत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर लोकांची दिशाभूल करत आहेत, असे संजय घाडी म्हणाले.
या घटनेचे पडसाद कल्याणमध्येही उमटले. उद्धवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्र कपोते यांनी संताप व्यक्त करत त्यांनी कल्याणमध्ये येऊन दाखवावे, असे खुले आव्हान दिले. तर फोटो फाडण्याची कृती करणाऱ्यांवर त्यांच्या पक्षाचे नेते काय कारवाई करणार, असा सवाल उद्धवसेनेचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केला.
दरम्यान, सभागृहात मुंबई हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांना पेढे वाटण्याची अनुमती महापौरांनी दिली. बाहेर विरोधक बाळासाहेबांच्या घटनेवरून निषेध व्यक्त करत असताना सभागृहात मात्र पेढे वाटू देण्याच्या महापौरांच्या कृतीचा जितका करावा तितका निषेध कमीच आहे, असे उद्धवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा