रात्रीच्या आकाशात दिसणारा चंद्र हा मानवाला पूर्वापारपासून आकर्षित करत आला आहे. मात्र, आता या परिचित चंद्राशिवाय आणखी एक छोटा चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करत असल्याचे खगोलशास्त्रज्ञांना आढळले आहे. अवकाशातून प्रवास करणाऱ्या एका छोट्या लघुग्रहाला पृथ्वीने आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने खेचून घेतले आहे. या लघुग्रहाला २०२६ क्यूक्यू ८ असे नाव देण्यात आले आहे. जवळपास दोन मीटर व्यासाचा हा लघुग्रह म्हणजे अवकाशात फिरणारा मोठा दगडच आहे आणि खगोलशास्त्राच्या भाषेत त्याला मिनीमून, म्हणजेच छोटा चंद्र, असे म्हटले जाते.
हंगेरीच्या खगोलशास्त्रज्ञाने केला शोध
हंगेरीचे खगोलशास्त्रज्ञ क्रिस्तियान सार्नेझ्की यांनी ऑगस्ट २०२६ मध्ये सर्वप्रथम या लघुग्रहाचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास सुरू झाला. सुरुवातीला हा लघुग्रह आहे की अंतराळ मोहिमेदरम्यान अवकाशात राहिलेला एखाद्या कृत्रिम वस्तूचा तुकडा आहे, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये संभ्रम होता. मात्र, शक्तिशाली दुर्बिणींच्या मदतीने केलेल्या निरीक्षणांमधून ही नैसर्गिक खगोलीय वस्तू असल्याचे स्पष्ट झाले. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या मायनर प्लॅनेट सेंटरने २९ ऑक्टोबर रोजी यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. हा छोटा चंद्र एप्रिलपासून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असल्याचे संशोधकांना आढळले आहे.
जानेवारी २०२७ पर्यंत पृथ्वीपासून दूर जाणार
आपल्या सौरमालेत लाखो लहान-मोठे लघुग्रह सूर्याभोवती भ्रमण करत असतात. यांपैकी काही लघुग्रह भ्रमणादरम्यान पृथ्वीच्या जवळून जातात. पृथ्वीच्या जवळ येताना एखाद्या लघुग्रहाचा वेग आणि दिशा अनुकूल असल्यास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो तात्पुरता तिच्याभोवती फिरू लागतो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचा एकत्रित परिणाम अशा लघुग्रहांच्या भ्रमणमार्गावर होत असतो. हे लघुग्रह कायमस्वरूपी पृथ्वीभोवती फिरत नाहीत. कालांतराने त्यांच्या भ्रमणमार्गात आणि वेगात बदल होतो आणि ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून मुक्त होऊन पुन्हा सूर्याभोवती भ्रमण करू लागतात. सध्या पृथ्वीला मिळालेला छोटा चंद्रही जानेवारी २०२७ पर्यंत पृथ्वीपासून दूर जाण्याची शक्यता आहे. या नव्या चंद्राला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३५९ दिवस लागतात आणि साधारण दर दहा वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळ येतो. मात्र, या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा