सोलापूर शहरावरील पाणीटंचाईचा शिक्का पुसून शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था उभी केली जाणार आहे. यासाठी एक हजार ३५० कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा सुधारित योजनेला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार उपस्थित होते. योजनेला मान्यता मिळाल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद व्यक्त केला. या योजनेमुळे सोलापूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला आधुनिक स्वरूप मिळणार असून, भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण केले जाणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. कामांदरम्यान रस्त्यांचे उत्खनन झाल्यास संबंधित कंपनीकडून रस्त्यांची कामे पूर्ववत करून दिली जाणार आहेत.
८० कोटींचा सौरऊर्जा प्रकल्पही उभारणार
पाणीपुरवठा योजनेला सौरऊर्जेची जोड देण्यात येणार आहे. केगाव आणि शिवाजीनगर येथील महानगरपालिकेच्या सर्वे क्रमांक २७ व २८ मधील २०.६ हेक्टर जागेवर १३ मेगावॅट डीसी आणि १० मेगावॅट एसी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुमारे ८० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा यंत्रणेसाठी लागणाऱ्या विजेच्या खर्चात २० ते ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दोन जलशुद्धीकरण केंद्रे उभारणार
या योजनेंतर्गत १२० एमएलडी आणि ३० एमएलडी क्षमतेची नवीन दोन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण १५० एमएलडी क्षमतेची नवीन जलशुद्धीकरण सुविधा उपलब्ध होईल. पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ३० नवीन उंच जलकुंभ आणि १० एमबीआर टाक्या उभारण्यात येणार आहेत. ही योजना पूर्ण होण्यासाठी शहरातील आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हा विषय लावून धरल्याचे सांगत पालकमंत्री गोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा