मुंबईत बुधवारी तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पुढील पाच वर्षांच्या आर्थिक उद्दिष्टांची माहिती दिली. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
एकट्या मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभ्या राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. शहरे ही केवळ गर्दीची केंद्रे नसून आर्थिक विकासाची इंजिने आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरीकरण ही संधी, ओझे नाही
शहरीकरणाकडे समस्या म्हणून न पाहता विकासाची मोठी संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहरे ही शहरी विकासाची तीन महत्त्वाची तत्त्वे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंग, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तिसरी आणि चौथी मुंबई आकाराला
राज्याच्या भविष्यातील शहरी विकासाचे चित्र मांडताना मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईच्या निर्मितीचा उल्लेख केला. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित होत असून, तिथे एज्यु-सिटी, स्पोर्टस् सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी उभी राहणार आहे.
विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येत आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारले जात असून, ते जगातील दहा मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा