दादर स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्याच्या मागणीबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर महायुतीतच मतभेद उफाळले आहेत. भाजपने या नामकरणाला पाठिंबा दिला आहे, तर मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने त्याला विरोध केला आहे. शिवसेना उपनेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहून या निर्णयावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
शिशिर शिंदे यांचे आरोप काय?
शिशिर शिंदे यांनी हा निर्णय म्हणजे शिवसेनाप्रमुखांचा अपमान असल्याचे म्हटले असून, भाजपकडून मतांचे राजकारण करत ध्रुवीकरण केले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने आधी मुंबईत कबुतरांच्या मुद्द्यावरून वाद पेटवला आणि मराठी विरुद्ध गुजराती व जैन समाज असा वाद भडकावला. त्यानंतर छटपूजेवरून वातावरण भडकवत मराठी विरुद्ध बिहारी आणि उत्तर भारतीय असा वाद पेटवण्यात आला. छट उत्सवानंतर मुंबईतील बिहारींनी मराठी माणसाला हिणवल्याचा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडियावरून मराठी माणसाविरुद्ध विषारी टीका करण्यात आली, मात्र मराठी माणसाने संयम दाखवल्याचे शिंदे म्हणाले. भाजपने स्वतःची मतपेढी मजबूत केली, पण मराठी अस्मिता जखमी केली आणि मौन बाळगून मराठी माणसाला एकटे पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नामकरणामुळे फूट पडेल, अशी भीती
आता दादरचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची उबळ भाजपला आल्याचा आरोप करत, मराठींमध्येच फूट पाडून मुंबईसह महाराष्ट्रात रस्त्यावर मराठी माणसांत आपसात संघर्ष घडवण्याचा भाजपचा हेतू असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर पोलिस कारवाई जोरदार होईल, पोलिसांच्या दडपशाहीने मराठी तरुण तुरुंगात जातील, रोजगाराच्या चांगल्या संधी जातील आणि मराठी शक्ती क्षीण होईल. दरम्यान, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय भव्य आणि ऐतिहासिक स्मारक इंदु मिलमध्ये पूर्णत्वास येत आहे. गेली काही वर्षे इंदु मिलमधील स्मारकाचे काम रखडलेले आहे. प्रत्येक मराठी माणसाला भारतरत्न बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा