, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कचरा नियम मोडणाऱ्या सोसायट्यांना १० हजारांपर्यंत दंड

ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या सोसायट्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. पहिल्या उल्लंघनाला १,०००, दुसऱ्याला ५,०००, तिसऱ्याला १०,००० रुपये दंड.

कचरा नियम मोडणाऱ्या सोसायट्यांना १० हजारांपर्यंत दंड

ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांवर महापालिका दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहे. कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांना पहिल्या वेळी एक हजार, दुसऱ्यांदा पाच हजार, तर तिसऱ्यांदा थेट दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. एवढ्यावरही सोसायट्यांनी नियमांचे पालन केले नाही आणि एका आर्थिक वर्षात चौथ्यांदा उल्लंघन केले, तर त्यांची मालमत्ता करातील सवलत रद्द केली जाणार आहे.

दंडाची रचना अशी

सोसायट्यांमधील कचरा व्यवस्थापन यंत्रणा प्रत्यक्ष सुरू आहे की नाही, याची पालिकेची पथके दरमहा तपासणी करणार आहेत. त्यामुळे कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाटीबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या सोसायट्यांवर नियमित देखरेख राहणार आहे. सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते का, प्रत्यक्ष किती कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि वर्गीकृत केलेला कचरा अधिकृत यंत्रणेकडेच दिला जातो का, याचीही तपासणी केली जाणार आहे.

संबंधित संस्थेला दंडात्मक कारवाईपूर्वी नोटीस देऊन बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. तपासणी अहवालात नियमांचे उल्लंघन आढळल्यास करसवलत रोखणे, स्थगित करणे किंवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यासही सवलत रद्द करून त्यापोटी मिळालेले लाभ वसूल करण्याची तरतूद आहे.

नवी नियमावली आणि सवलत

महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या निवासी सोसायट्यांसाठी कचरा व्यवस्थापनाची नवी नियमावली लागू केली आहे. सोसायट्यांना ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य नसलेल्या सोसायट्यांना पालिकेकडून विशेष परवानगी घेऊन अधिकृत यंत्रणेमार्फत कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागेल. यासाठी प्रत्येक घरामागे दरमहा २३५ रुपये शुल्क भरून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, नियमांचे पालन करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता कराच्या सर्वसाधारण कर घटकात १५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. ओल्या कचऱ्याची प्रक्रिया, सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर किंवा पावसाचे पाणी साठवण्याच्या व्यवस्थेसाठी ही सवलत देण्यात येणार आहे.

अनेक छोट्या सोसायट्या ओला आणि सुका कचरा घरात वेगळा करतात, मात्र पालिकेची गाडी दोन्ही कचरा एकत्रित नेते, असा प्रश्न सोसायट्यांकडून केला जात आहे. यावर उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, सुक्या कचऱ्यासाठी २५ विभागांत ९६ वाहने असून सोसायटीने मागणी केल्यास ती वाहने पाठवण्यात येतात. ज्या सोसायटीत हाऊस कीपिंग एजन्सी असते, ती उपयुक्त सुका कचरा आधीच काढून टाकते आणि नको असलेला कचरा पालिकेकडे दिला जातो.

या प्रस्तावाला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा विरोध आहे. जुन्या इमारतींमध्ये कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसताना सोसायट्यांवर दंड आकारणे अन्यायकारक आहे, अशी संघटनेची भूमिका आहे. गृहनिर्माण तज्ज्ञ डॉ. सुरेंद्र मोरे यांच्या मते, कंपोस्ट प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च येतो आणि दरमहा सुमारे २० हजार रुपये देखभाल खर्च येतो. त्यामुळे १५ टक्के मालमत्ता कर सवलतीतून या खर्चाच्या १० टक्के रक्कमही भरून निघणार नाही. दंड आकारण्यापूर्वी कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance