बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नाही, तर त्याच्या वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिला आहे. त्याच्या आयुष्यात अनेक प्रेमसंबंध आले. विशेष म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतच्या कथित अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. आता साजन चित्रपटाचे दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी या चर्चेला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स यांना संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले. मात्र त्यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले. त्याऐवजी त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार संजय अनेकदा सेटवर येऊन माधुरीचे क्लोजअप शॉट्स पाहत असे. लॉरेन्स स्वतः दिग्दर्शनासोबत कॅमेराही हाताळत असल्यामुळे संजय मॉनिटरमधून माधुरीला पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र त्या दोघांमध्ये खरंच प्रेमसंबंध होते का, याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टीना मुनीमपासून रेखापर्यंत चर्चा
संजय दत्तच्या प्रेमप्रकरणांची चर्चा त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच सुरू होती. त्याचे पहिले नाव जोडले गेले ते अभिनेत्री टीना मुनीम यांच्यासोबत. रॉकी चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. काही काळ हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र पुढे त्यांचे मार्ग वेगळे झाले. यानंतर संजय दत्तचे नाव अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि किमी काटकर यांच्यासोबतही जोडले गेले. अभिनेत्री रेखा यांच्यासोबतही संजयच्या नावाची चर्चा झाली होती. जमीन आसमान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
तीन लग्न आणि वादग्रस्त प्रतिमा
संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्या तीन लग्नांबद्दलही नेहमी चर्चा होत असते. पहिल्या पत्नीचे निधन, दुसऱ्या लग्नाचा घटस्फोट आणि त्यानंतरचे तिसरे लग्न यामुळे त्याचे वैयक्तिक आयुष्य सातत्याने चर्चेचा विषय ठरले. चित्रपटांमधील यशासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त घडामोडींनीही त्याला कायम चर्चेत ठेवले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा