हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती छातीत होणारी तीव्र वेदना. मात्र, प्रत्येक वेळी हार्ट अटॅकची सुरुवात छातीत दुखण्यानेच होते असे नाही. काही वेळा छातीत वेदना जाणवण्यापूर्वीच शरीर काही संकेत देत असते. त्यामध्ये अचानक थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे किंवा थंड घाम येणे यांसारखी लक्षणे हार्ट अटॅकची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. हृदयविकाराचा झटका येताना प्रत्येक व्यक्तीला सारखीच लक्षणे जाणवतात असे नाही. काही रुग्णांमध्ये सुरुवातीला छातीत वेदना न होता इतर त्रास जाणवू शकतात.
छातीत दुखण्याआधी दिसणारी 5 लक्षणे
पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही अचानक अशक्तपणा किंवा असामान्य थकवा जाणवणे हे संभाव्य धोक्याचे लक्षण असू शकते. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. कोणतेही मोठे शारीरिक श्रम न करता धाप लागणे किंवा अचानक श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयाशी संबंधित समस्येचे संकेत असू शकते. काही वेळा छातीत दुखत नसतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अचानक मळमळणे, उलट्या होणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे हीदेखील हार्ट अटॅकची संभाव्य लक्षणे आहेत. अनेकदा लोक याला अॅसिडिटी किंवा अपचन समजून दुर्लक्ष करतात. कोणतेही शारीरिक श्रम न करता अचानक थंड घाम फुटणे, अंगाला घाम येणे आणि अस्वस्थ वाटणे ही लक्षणे गंभीर असू शकतात. अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे याकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
महिलांमधील लक्षणे आणि काय करावे?
महिलांमध्येही छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे हे हार्ट अटॅकचे महत्त्वाचे लक्षण आहे. मात्र, त्यासोबत किंवा त्याऐवजी पाठ, मान, जबडा आणि खांद्यामध्ये वेदना होणे, असामान्य थकवा, श्वास घेण्यास त्रास आणि मळमळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे महिलांनी या लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. छातीत दडपण किंवा वेदना, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम, चक्कर किंवा इतर संशयास्पद लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. स्वतः वाहन चालवून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, लक्षणे आपोआप कमी होण्याची वाट पाहू नये.
प्रतिक्रिया व्यक्त करा