परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील साडेतीन हजार नागरिकांची भिस्त सध्या एकाच विहिरीवर आहे. या विहिरीतील पाणी पन्नास ते साठ फूट खोल गेले असून, विहीर आटण्याच्या मार्गावर आहे.
दोन-तीन महिन्यांपासून टंचाई
गावकऱ्यांच्या माहितीनुसार ही परिस्थिती गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कायम आहे. गावात नळ योजना असली तरी तिला पाणी येत नाही, त्यामुळे ती योजना कुचकामी ठरली आहे. महिला, पुरुष आणि लहान मुलेही पाण्यासाठी याच एकमेव विहिरीवर अवलंबून आहेत.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी
विहिरीतील पाणी फक्त काही दिवसच पुरेल, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर एक किलोमीटर दूर शेतातील विहिरींवर पाणी आणण्यासाठी जावे लागेल. या वर्षी दुष्काळाची चाहूल लवकरच लागल्याने दरवर्षीपेक्षा परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. प्रशासनाने तातडीने गावात पाणी उपलब्ध करून द्यावे, विशेषतः टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा