पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्याला एका वर्षात सहा हजार रुपयांची मदत करण्यात येते. प्रत्येकी तीन हप्त्यांत दोन हजार रुपये सन्मान निधी दिला जातो. मात्र एकाच कुटुंबातील पती-पत्नीला स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ मिळू शकतो का, याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ
योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकाच पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यात येतो. पती आणि पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे हप्ता देण्यात येत नाही. एकाच व्यक्तीला ही रक्कम देण्यात येते. कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र ठरते.
कुटुंबाची व्याख्या आणि नियम
योजनेच्या नियमावलीनुसार शेतकरी कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होतो. पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे शेतीची नोंद असली तरी ते एकाच कुटुंबाचे घटक म्हणून गणले जातात. त्यामुळे कुटुंबातील केवळ एकाच पात्र सदस्याला वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.
दोघांनी लाभ घेतल्यास काय होते?
जर चुकून एखाद्या कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांनाही वेगवेगळ्या अर्जाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळत असेल, तर ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान असे प्रकार समोर येतात. नियमबाह्य जमा झालेली ही रक्कम वसूल करणे अथवा पुढील हप्ता रोखणे यासारखी कारवाई यंत्रणा करू शकते. चुकून काहींनी लाभ घेतला असेल तर नेहमीच्या ई-केवायसी प्रक्रियेने एकाचे नाव योजनेतून बाद करण्यात येते.
योजनेच्या अटींनुसार कुटुंबातील कोणत्याही सदस्याने एका आर्थिक वर्षात आयकर भरला असेल, त्याचे निवृत्तीवेतन दरमहा दहा हजार रुपयांहून अधिक असेल, अथवा तो केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेतील निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी असल्यास अशा कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. डॉक्टर, वकील, अभियंता, सीए अथवा व्यवसाय करणाऱ्यांनाही या योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
Leave a Reply