छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हे संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. नाथांमुळे पैठण वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध भूमी म्हणून ओळखले जाऊ लागले. संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पैठणमध्ये साजरा होणारा नाथषष्ठी यात्रोत्सव ही भाविकांसाठी मोठी पर्वणी ठरते. या यात्रोत्सवाला ४२७ वर्षांची परंपरा आहे.
एकनाथ महाराजांची जन्मभूमी
संत एकनाथ महाराज यांचा जन्म १५३३ मध्ये पैठण येथे झाला. शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज हे उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ते आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. भारुडातून त्यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे पैठणला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व प्राप्त झाले.
पंढरपूरनंतरची दुसरी मोठी यात्रा
पैठणमध्ये साजरा होणारा नाथषष्ठी यात्रोत्सव पंढरपूरनंतरची राज्यातील दुसरी मोठी यात्रा मानला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आणि भाविक पायी चालत पैठणमध्ये दाखल होतात. या यात्रेच्या काळात पैठणनगरीत भक्तीचा मळा फुलतो आणि संपूर्ण शहर वारकऱ्यांच्या उपस्थितीने गजबजून जाते.
४२७ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात आहे. नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या निमित्ताने पैठणमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा