भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सीजेपीचे अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. या आंदोलनामागे मोठे षडयंत्र असून त्यासाठी मोठा पैसा लागला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या वतीने ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ ही पदयात्रा काढण्यात आली. दिल्ली गेट परिसरात झालेल्या जाहीर सभेनंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी दिपके यांच्यावर निशाणा साधला.
जे अभिजीत दिपके गेले कित्येक वर्ष देशातच राहत नाहीत, त्यांना अचानक देशाची काळजी कशी वाटायला लागली, असा सवाल विखे पाटील यांनी केला. ज्याने आपल्या शेजाऱ्याचं कुंपण काढायला कधी मदत केली नाही, तो आज देशाला शहाणपण शिकवायला निघाला आहे, अशा शब्दांत त्यांनी दिपके यांचा समाचार घेतला.
जनता मतातून उत्तर देईल
विरोधकांच्या भूमिकेवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, काँग्रेस, सीजेपी आणि विरोधकांकडून सध्या देशात अराजकता पसरवण्याचे काम सुरू आहे. त्याला विरोध करण्यासाठी आणि संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, हा संदेश देण्यासाठी अहिल्यानगरमध्ये ही पदयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सीजेपीच्या आंदोलनामागे कोणाचे तरी षडयंत्र आणि मोठा पैसा असला तरी देशातील जनता आपल्या मतातून त्यांना चोख उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऊस दराचे गणित
दरम्यान, सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस दराच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी साखर कारखान्यांची बाजू मांडली.
यंदाचा हंगाम संपेपर्यंत साखरेचा दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल राहिला आणि उसाची रिकव्हरी सव्वा अकरा ते साडेअकरा टक्क्यांपर्यंत राहिली, तर साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये प्रति टन दर द्यायला कोणतीही अडचण राहणार नाही, असे ते म्हणाले. मात्र कालच साखरेचे दर पाच हजारांच्या खाली आले आहेत. त्यामुळे उद्याच्या साखरेच्या दरावर आधारित आताच उसाचा दर जाहीर करणे शक्य होणार नाही, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply