मुंबईतील नामांकित विचारे प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘मराठी गौरव पुरस्कार’ देऊन भव्य सन्मान करण्यात आला. मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘भारत श्री’ विजू पेणकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. विचारे प्रतिष्ठानचे अजय विचारे यावेळी विशेष उपस्थित होते.
दोन दिग्गजांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
या कार्यक्रमात क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात आयुष्यभर मोलाचे कार्य करणाऱ्या दोन दिग्गजांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. मल्लखांब आणि क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री उदय देशपांडे यांचा, तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार म्हणून केलेल्या प्रदीर्घ आणि दर्जेदार कामगिरीबद्दल संदीप चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.
‘मराठी गौरव’ पुरस्काराचे मानकरी
रौप्य महोत्सवी सोहळ्यात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू व प्रशिक्षक रघुनंदन गोखले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कॅरमपटू अरुण केदार, अर्जुन पुरस्कार विजेत्या जलतरणपटू आरती प्रधान आणि प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘मराठी गौरव पुरस्कार’ देण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी आणि अशोक बोभाटे, क्रिकेट पिच क्युरेटर रमेश म्हामुणकर, ज्येष्ठ क्रिकेट स्कोरर दीपक जोशी आणि न्यूज अँकर अश्विन बापट यांचाही सन्मान करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार स्वाती घोसाळकर यांनी केले. या सोहळ्याला क्रीडा आणि माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply