सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? सपकाळांचा तटकरेंना सवाल

पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार विमान दुर्घटनेच्या तपासावरून सुनील तटकरे यांना सवाल केला. डिलिमिटेशन आणि निवडणूक आयोगावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? सपकाळांचा तटकरेंना सवाल

निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी आहे आणि निवडणूक आयोगाची वकिली भलतीच लोक करत आहेत, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा डिलिमिटेशन आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. डिलिमिटेशन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार विमान दुर्घटनेवरूनही त्यांनी भूमिका मांडली. यावेळी सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, इतके दिवस झोपले होते का, असा सवालही सपकाळ यांनी केला.

निवडणूक आयुक्त भेटत नाहीत, असा टोला

राजू शेट्टी यांनी सांगितले की, त्यांना निवडणूक आयुक्त भेटले होते. त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले, तुम्ही नशीबवान आहात की एकटे गेले आणि निवडणूक आयुक्त तुम्हाला भेटले. आम्ही तीनशे खासदार घेऊन गेलो तरी निवडणूक आयुक्त भेटत नाहीत, ही आजची वस्तुस्थिती आहे, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयुक्तांना टोलाही लगावला. लोकांना उत्तर मिळत नाहीत, आता अस्वस्थता वाढत जात आहे. आता निवडणुका होतील की नाही यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत, असेही सपकाळ यांनी म्हटले.

विमान दुर्घटनेच्या तपासावरून सवाल

अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. याच आठवड्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकांवर गंभीर आरोप केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हीएसआर कंपनीच्या मालकास वाचवत असल्याचेही त्यांनी म्हटले. त्याच अनुषंगाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आता गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही, आता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटणार आहोत, असे म्हटले. त्यावर, आत्तापर्यंत झोपा काढत होता का, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

मोदींच्या सोने खरेदीच्या वक्तव्यावर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही सपकाळ यांनी पलटवार केला. मी वर्षभरापूर्वी सांगितले होते गरज नसेल तर सोने खरेदी करू नका, लोकांनी माझे ऐकले आणि त्यांचा फायदा झाला, असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावर, नरेंद्र मोदी यांनी परदेशी दौरे करू नका असे देखील सांगितले होते, भाज्यांमध्ये तेल टाकू नका असे देखील सांगितले होते. मात्र स्वतःच्या वाढदिवसाला जे दिवे लावले यातच सगळे आले, असा टोला सपकाळ यांनी मोदींच्या वक्तव्यावरून लगावला.

डिलिमिटेशन बिलाला विरोधच

भाजपाला डिलिमिटेशन करून देशात पुन्हा जातीय दंगली घडवायच्या आहेत, इंडिया आघाडीमध्ये असणारे लोक या बिलाला विरोध करत आहेत. इंडिया आघाडी पातळीवर या सगळ्या विषयांवर चर्चा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही, सुप्रिया सुळे त्यांचे म्हणणे मांडत आहेत. ते फक्त बिलावर बोलत आहेत, पण डिलिमिटेशनचे बिल अजून आले नाही, असेही सपकाळ यांनी म्हटले.

दरम्यान, रोहित पवार यांच्या भूमिकेवर बोलताना सपकाळ म्हणाले की, तो आमचा मित्र पक्ष आहे, त्यांच्या पक्षातील अंतर्गत गोष्टीवर आम्ही भाष्य करणे योग्य नाही. आमचा मित्र पक्ष आहे, त्यांचे काम चांगले आहे, त्यांच्या कामाचे कौतुक आम्ही करतो. पण अंतर्गत गोष्टीवर बोलणे योग्य नाही, असे म्हणत रोहित पवार यांच्या काँग्रेस प्रवेशावर सपकाळ यांनी बोलणे टाळले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance