पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांना व्हर्च्युअली संबोधित करताना गेल्या बारा ते तेरा वर्षांत देशातील सुमारे पन्नास कोटी नागरिक गरिबीरेषेबाहेर आल्याचा दावा केला. दिवाळी स्नेहमिलन समारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळी आणि गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मोदी म्हणाले की, एक हजार वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. सरकारी कल्याणकारी योजनांमुळे हे शक्य झाल्याचे सांगताना त्यांनी या योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले.
पक्षापेक्षा देश मोठा
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांच्या समर्पणाचा आणि सेवाभावाचा गौरव केला. भाजपसाठी नेहमीच पक्षापेक्षा देश प्रथम राहिला आहे, असे ते म्हणाले. पक्षात पदांपेक्षा कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीला अधिक महत्त्व दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी समाजात सामाजिक सलोखा अधिक बळकट करावा आणि विकसित भारतासाठी विकसित गुजरात घडवण्याचे काम जोमाने करावे, असे आवाहन मोदींनी केले. कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच गुजरातसह संपूर्ण देश आणि अनेक राज्यांची सेवा करणे शक्य झाल्याचेही ते म्हणाले.
गुजरातचा कायापालट
गुजरातमध्ये झालेल्या बदलांवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा गुजरातची ओळख केवळ व्यापारापुरती मर्यादित होती. एका ठिकाणाहून माल खरेदी करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी विकायचा, एवढेच तिथे चालायचे. राज्यात खाणी किंवा खनिजे नव्हती; मिठाशिवाय दुसरे काहीही नव्हते, असे ते म्हणाले.
मात्र आज गुजरात पारंपरिक व्यापार आणि उद्योगांच्या पलीकडे जाऊन खूप पुढे गेल्याचे मोदी म्हणाले. आज गुजरात कृषी, डेअरी, सेमीकंडक्टर, ऑटोमोबाईल, हरित ऊर्जा आणि आधुनिक पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये देशात अग्रणी राज्य म्हणून उदयास आल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply