काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र चर्चेत असताना त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गांधी कुटुंबाबाबत सोशल मीडियावर काही दावे केले आहेत. त्यांनी गांधी कुटुंबातील सदस्य अफगाणिस्तानात बाबरच्या कबरीवर फुले वाहण्यासाठी गेल्याचा दावा केला आहे.
दुबे यांनी एक्सवर पोस्ट करत हा दावा मांडला आहे. त्यांनी आपल्या पोस्टला काँग्रेसचा काळा अध्याय, अध्याय २५१ असे शीर्षक दिले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही जुनी उदाहरणे देत गांधी कुटुंब आणि बाबर यांच्यातील संबंधांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
आपल्या पोस्टमध्ये दुबे यांनी लिहिले आहे की, २२ नोव्हेंबर १९५७ रोजी दिल्लीतील लाल किल्ला संग्रहालयातील बाबरची तलवार आणि युद्धवेषासह सुमारे ३१ वस्तू भारताच्या राजदूतांनी अफगाणिस्तानचे राजे झहीर शाह यांना भेट म्हणून दिल्या होत्या. त्यानंतर जानेवारी १९५८ मध्ये अफगाणिस्तानच्या राजांनी भारताला भेट दिली आणि अयोध्येतील बाबरी मशीद पाहण्यासाठी ते गेले, असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, या कुटुंबाने अफगाणिस्तानला भेट दिली आणि बाबरच्या कबरीवर फुले वाहिली. त्यांच्या दाव्यानुसार नेहरू सप्टेंबर १९५९ मध्ये, इंदिरा गांधी १९६८-६९ मध्ये, राजीव गांधी १९७६ मध्ये आणि राहुल गांधी २००५ मध्ये गेले. सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांनी आजपर्यंत अयोध्येतील राम मंदिराला भेट दिलेली नाही, परंतु संपूर्ण कुटुंब बाबरच्या कबरीवर फुले वाहण्यासाठी गेले आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मारुती कंपनीवरूनही प्रश्न
यापूर्वीही दुबे यांनी सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. परदेशी नागरिक असूनही सोनिया गांधी मारुती टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि ५० टक्के भागधारक कशा झाल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. २१ नोव्हेंबर १९७० रोजी संजय गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या कंपनीसोबत करार केल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
मारुती कंपनीची स्थापना १९७० मध्ये झाली असली, तरी १९६८ मध्येच भारत सरकारने तिला मोटारगाड्या तयार करण्यासंदर्भात पत्र दिले होते, असा दावा दुबे यांनी केला आहे. तसेच १९६९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार, कंपनी अस्तित्वात येण्यापूर्वीच, सर्व राज्य सरकारांनी बसची बॉडी बनवण्यासाठी मारुतीला आगाऊ रक्कम दिली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी कंपन्यांनी पैसे न देता थेट मारुतीला सिमेंट, स्टील आणि कोळसा कसा पुरवला, याचाही खुलासा पुस्तकात करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
Leave a Reply