रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मेळघाट अदानी प्रकल्पाचे काम थांबवा; पटेल यांची मागणी

मेळघाटमध्ये अदानी प्रकल्पाचे काम थांबवण्याची मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली. २२ गावांना वीज आणि पक्के रस्ते मिळावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

मेळघाट अदानी प्रकल्पाचे काम थांबवा; पटेल यांची मागणी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये उभारण्यात येत असलेल्या अदानी समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाचे काम थांबवण्याची मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे. ज्या ठिकाणी हा विद्युत प्रकल्प उभारला जात आहे, त्या ठिकाणी पटेल यांनी धडक भेट दिली. मागील मार्च महिन्यापासून आडनदी परिसरात अदानी समूहाच्या हायड्रो पंप प्रकल्पाचे काम सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून या कामाची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच अनुषंगाने पटेल आणि रोहित पटेल यांनी कार्यकर्त्यांसह मडकी गावाजवळ असलेल्या प्रकल्पाच्या कॅम्पला भेट देऊन तेथील संपूर्ण कामाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

पटेल यांनी काय म्हटले?

मेळघाटातील लोकांची जमीन या प्रकल्पाच्या आसपास असली, तरी त्यांना विहीर खोदता येत नाही, कोणतेही ब्लास्टिंग करता येत नाही आणि बोअरवेलही खोदता येत नाही, असे पटेल म्हणाले. मेळघाटातील लोकांवर इतकी बंधने असताना अदानीला मात्र पूर्णपणे मोकळीक असल्याचा आरोप त्यांनी केला. अदानीला मशीनसह ड्रिल करण्यालाही कोणतीही बंदी नाही, असे ते म्हणाले. इथले उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत बसत नाहीत, समोरासमोर बसत नाहीत. वन विभागाचे अधिकारीही येत नाहीत. समोरासमोर बसून शांततेत चर्चा व्हावी आणि आम्हाला काहीतरी मार्ग द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही, असेही पटेल म्हणाले. आम्ही त्यांना सांगितले की ड्रिल बंद करा; त्यानुसार त्यांनी ऐकले आणि ड्रिल बंद केली, असे पटेल यावेळी बोलताना म्हणाले.

नेमकी मागणी काय?

आजही मेळघाटातील २२ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. सुमारे ४० गावांना जोडणारे रस्ते अजूनही कच्चे, म्हणजेच मातीचे आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर विहिरी किंवा बोअरवेल खोदण्यासाठी वन विभागाकडून परवानगी नाकारली जाते. मग अदानी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी इतक्या तत्परतेने परवानगी कशी काय दिली गेली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या दुटप्पी धोरणाचा निषेध करत, माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी चिखलदरा तालुक्यातील अदनादी येथे जाऊन अदानी प्रकल्पाशी संबंधित कामांची पाहणी केली आणि हे काम थांबवण्यास भाग पाडले, असे सांगण्यात आले.

सर्वप्रथम मेळघाटातील २२ गावांमध्ये वीजपुरवठा केला जावा, ग्रामीण भागांत पक्के रस्ते बांधले जावेत आणि शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळण्याचा अधिकार मिळावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांसाठी जनसुनावणी पूर्ण होईपर्यंत आणि वन विभागासह सर्व आवश्यक परवानग्या व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अदानी प्रकल्पाचे कोणतेही पुढील काम सुरू होऊ नये, अशी मागणी आहे. मेळघाटातील लोकांचे हक्क आणि त्यांच्या विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि हा संघर्ष सुरूच राहील, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, मेळघाट येथील अदानी समूहाचा प्रस्तावित प्रकल्प हा १,५०० मेगावॉट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असलेल्या आडनदी परिसरात हा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance