उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीआयच्या तरुणांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कौशल्य विकास, रोजगार, कृत्रिम बुद्धिमत्ता, देशातील उत्पादन क्षेत्र आणि तरुणांच्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. ज्याच्याकडे कौशल्य आणि जिद्द आहे, त्याचा रोजगार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आगामी काळात कौशल्य असलेल्या तरुणांची मागणी वाढणार आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी त्यांनी देशातील नागरिकांना एक वर्ष सोने-चांदी खरेदी करू नका, असे आवाहन केले होते. देशातील नागरिकांनी त्यांचे म्हणणे ऐकले असून त्याचा परिणाम आज दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
कौशल्यालाच खरा सन्मान मिळणार
कौशल्य विकास कार्यक्रमात तरुणांना संबोधित करताना मोदी म्हणाले, काळ बदलत आहे. केवळ कागदी प्रमाणपत्र घेऊन फिरणाऱ्यांपेक्षा कौशल्य असलेल्या लोकांचा सन्मान वाढणार आहे. ज्याच्याकडे कौशल्य आहे, त्याची मागणी वाढणार आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना समाजात मिळणाऱ्या वागणुकीबाबतही पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, ब्रिटिशांनी भारतातील कौशल्याधारित उद्योगांना मागे टाकून स्वतःच्या देशातील उद्योगांना पुढे नेले. अनेक गोष्टी ते आपल्या देशात घेऊन गेले आणि उत्पादन क्षेत्राचा विस्तार केला. कालांतराने कागदी कामाला अधिक महत्त्व मिळू लागले आणि कौशल्य मागे पडले.
आजही एखादे मूल आयटीआयमध्ये प्रवेश घेत असेल, तर काही जण नातेवाईकांना सांगण्याऐवजी ही गोष्ट लपवतात. ही परिस्थिती मला बदलायची आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना जितका सन्मान मिळतो, तितकाच सन्मान आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही मिळाला पाहिजे, असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. मोठमोठ्या कंपन्यांना केवळ प्रमाणपत्रधारकांची गरज नसते, तर कंपनीला बळ देण्यासाठी २०० ते ३०० कुशल आयटीआय आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, असेही ते म्हणाले.
Leave a Reply