धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका नगरसेवकाने टिपू सुलतान यांची जयंती साजरी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजप नगरसेवक विलास लोंढे यांनी धाराशिव शहरातील टिपू सुलतान चौकात आयोजित जयंती कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात एमआयएमचे नगरसेवक अझहर मुजावर यांनी लोंढे यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आणि रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भाजप नगरसेवकाच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कार्यक्रमात नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील टिपू सुलतान चौकात टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक विलास लोंढे उपस्थित होते. यावेळी एमआयएमचे नगरसेवक अझहर मुजावर यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नगरसेवकांच्या या एकत्रित उपस्थितीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून यापूर्वी अनेकदा राजकीय भूमिका आणि वाद समोर आले आहेत.
या उपस्थितीला राजकीय महत्त्व का?
अशा पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकानेच जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग घेतल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात या उपस्थितीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. या कार्यक्रमातील स्वागताचा व्हिडिओ तसेच जयंती साजरी करतानाचे रिल्स नगरसेवक विलास लोंढे यांच्याकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. भाजप नगरसेवकाने टिपू सुलतान यांची जयंती साजरी केल्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावरही चर्चा रंगू लागली आहे.
भाजप आणि एमआयएम या दोन पक्षांच्या स्थानिक नगरसेवकांची एकाच कार्यक्रमातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेवर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असणार, तसेच पक्षाकडून याबाबत काही प्रतिक्रिया दिली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे पक्षीय राजकारणात टिपू सुलतान यांच्या जयंतीचा मुद्दा अनेकदा चर्चेत येत असताना, दुसरीकडे भाजप नगरसेवकाच्या या सहभागामुळे धाराशिवमधील राजकीय चर्चेला नवा विषय मिळाला आहे.
Leave a Reply