भारतीय जनता पक्षाने आपल्या ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. पक्षाकडून नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली असून, देशभरातील विविध राज्यांतील नेत्यांना संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांनाही स्थान मिळाले आहे.
सात राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती
भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय मंत्री, कोषाध्यक्ष, कार्यालय मंत्री, मीडिया संयोजक, सोशल मीडिया संयोजक आणि धोरण व संशोधन विभागातील पदांसाठी नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी एकूण सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आसामचे जोगेन मोहन, ओडिशाच्या ममता मोहंता, उत्तर प्रदेशचे संगम लाल गुप्ता, महाराष्ट्राचे बबनराव रावजी चौधरी, दिल्लीचे सत प्रकाश राणा, बिहारचे डॉ. अर्जुन साहनी आणि उत्तर प्रदेशच्या संगीता बलवंत बिंद यांचा समावेश आहे.
या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बाब म्हणजे बबनराव रावजी चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याशिवाय राहुल गोविंद केंद्रे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील ३७ जणांना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या दोन्ही नियुक्त्यांकडे राज्यातील भाजपच्या संघटनात्मक घडामोडींच्या दृष्टीने लक्ष वेधले जात आहे.
महामंत्री, मंत्री आणि कार्यकारिणीतील नावे
राष्ट्रीय महामंत्रीपदी गजेंद्र यादव (दिल्ली), प्रमोद मध्वराज (कर्नाटक) आणि ललित चंद्राकार (छत्तीसगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मंत्रीपदी गुजरातचे दशरथजी ठाकोर, तमिळनाडूचे टी. वरथराजन, झारखंडचे संजीव कुमार, हरियाणाच्या सरिता जांगिड़, तेलंगणाचे कडगंची रमेश, मध्य प्रदेशचे वैभव पंवार आणि बिहारचे भीम कुमार साहू यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय मीडिया, सोशल मीडिया तसेच धोरण आणि संशोधन विभागातही विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी ३७ सदस्यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातून राहुल गोविंद केंद्रे यांच्यासह मुंबईतील हर्षदा फरांदे आणि डॉ. स्मिता आर. काळे यांचीही नावे कार्यकारिणी सदस्यांच्या यादीत आहेत. तसेच ओडिशाचे प्रो. अद्वैत चरण गणनायक, दिल्लीचे युजवेंद्र सिंह चहल आणि उत्तर प्रदेशच्या अधिवक्ता सीमा समृद्धी कुशवाह यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय संघटनात्मक रचनेत विविध राज्यांतील नेत्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.
Leave a Reply