तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेते थलपती विजय यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले होते. मात्र आता त्यांच्या सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा केला जात आहे.
बहुमताशिवाय सत्ता स्थापन
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. राजकारणात नवा पक्ष असूनही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. मात्र पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे विजय यांनी काँग्रेससोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
पलानीस्वामींचे भाकीत काय?
अन्नाद्रमुकचे नेते आणि महासचिव पलानीस्वामी यांनी या सरकारबाबत मोठे भाकीत केले आहे. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व कारणांमुळे हे सरकार कधीही कोसळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
अन्नाद्रमुककडून या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पलानीस्वामी म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव आणण्याची काहीही गरज नाही. हे सरकार कधीही कोसळू शकते.
विधानसभेत अन्नाद्रमुककडे सध्या पुरेसे संख्याबळ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या बातम्या केवळ माध्यमांतून पसरवल्या जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. महागाई गगनाला भिडली असून उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये जात आहेत, ही कारणेही त्यांनी दिली.
Leave a Reply