रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा मोठ्या समूहासोबत प्रवास करणाऱ्यांना एकाच वेळी अनेक रेल्वे तिकिटे बुक करणे सोपे होणार आहे. भारतीय रेल्वेच्या विभागाने ग्रुप आणि बल्क तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे लग्नसमारंभ, तीर्थयात्रा, शैक्षणिक सहली आणि विविध कार्यक्रमांसाठी एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बर्थ संख्येवरील कमाल मर्यादा हटवली
नवीन नियमांनुसार, ग्रुप रिझर्व्हेशनमध्ये एकाच वेळी बुक करता येणाऱ्या बर्थच्या संख्येवरची निश्चित कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे. यापूर्वी मोठ्या समूहासाठी तिकिटे बुक करताना संख्येची मर्यादा अडचणीची ठरत होती. मात्र, आता संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या मंजुरीने आवश्यकतेनुसार मोठ्या संख्येने तिकिटे बुक करता येऊ शकतील.
कोणत्या प्रवाशांना जास्त फायदा होणार?
लग्नसमारंभ किंवा बारातीत सहभागी होणाऱ्या कुटुंबीयांना, तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या मोठ्या समूहांना, शाळा आणि महाविद्यालयांच्या सहलींना, क्रीडा स्पर्धांसाठी प्रवास करणाऱ्या संघांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या कलाकारांना या बदलाचा फायदा होणार आहे.
रेल्वेने केलेल्या पाच मोठ्या बदलांमध्ये बल्क बुकिंगसाठी बर्थ संख्येची कमाल मर्यादा हटवणे, लग्न आणि तीर्थयात्रेसाठी मोठे ग्रुप एकत्र तिकीट काढू शकणे, सीआरएस आणि एसएम यांना ग्रुप बुकिंग मंजुरीचा अधिकार देणे, सर्व श्रेणींसह आरएसी आणि वेटिंग तिकिटांवरही ही सुविधा देणे आणि पडताळणी करूनच प्रवासाच्या गरजेनुसार अर्जाला मंजुरी देणे यांचा समावेश आहे.
अर्ज कुठे जमा करायचा?
प्रवासी प्रमुख आरक्षण केंद्रांवर सकाळी ९ वाजल्यापासून अर्ज स्वीकारले जातील. हे अर्ज थेट अधिकाऱ्यांकडे करावेत. एजंटमार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परतीच्या प्रवासाचा अर्ज स्वतंत्र बुकिंग म्हणून मानला जाईल. यामध्ये प्रवाशांना प्रवासाचा उद्देश आणि प्रवाशांची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असेल. गैरवापर टाळण्यासाठी प्रत्येक पानावर अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि शिक्का असेल.
Leave a Reply