इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. हा वाद मिटावा यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, पण त्यांना अद्याप यश आलेले नाही. अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू असतानाच इराणही चोख प्रत्युत्तर देत आहे. अशा वातावरणात इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (आयआरजीसी) प्रमुख अहमद वाहिदी यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.
इराणमधील क्षेपणास्त्र साठ्याची पाहणी करताना वाहिदी यांनी हे वक्तव्य केले. इराणी माध्यमांमध्ये या ठिकाणाला ‘मिसाइल सिटी’ म्हणून ओळखले जाते. ‘आतापर्यंत जे घडले, ती केवळ सुरुवात आहे. आमच्या शत्रूंना आगामी काळात आणखी अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागेल,’ असे वाहिदी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही देशांतील संघर्ष आणखी पेटतो की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
२८ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर तणाव वाढला
वाहिदी यांनी इराणचा विजय निश्चित होईल, सत्याचा विजय होईल आणि खोट्याचा पराभव होईल, असे सांगत अमेरिकेला लक्ष्य केले. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला होता.
या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तरादाखल आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले होते. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले होते.
अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा दावा
दरम्यान, इराणच्या आयआरजीसीने शनिवारी होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे एमक्यू-९ रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला. नव्याने तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने ही कारवाई केल्याचे इराणने म्हटले आहे. आतापर्यंत ५८ अमेरिकन ड्रोन पाडल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या वृत्ताला स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही.
आयआरजीसीचे प्रवक्ते होसैन मोहेबी यांनीही अमेरिका कोणत्याही लष्करी परिस्थितीचा सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याचे सांगितले. युद्ध किंवा शांततेच्या नावाखाली अनिश्चितता स्वीकारणार नसल्याची इराणची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पाकिस्ताननेही हे युद्ध थांबवण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्न केले होते, परंतु त्यात यश आले नाही.
Leave a Reply