राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमी असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या पर्यटन विकासाला गती मिळाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील प्रस्तावित विकासकामांच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे विकासाच्या प्रस्तावांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर पाहणी
यासंदर्भात सोमवारी मुंबई येथील मंत्रालयात पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या पर्यटन विकास आराखड्यातील विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली. प्रस्तावित कामांची व्यवहार्यता तपासण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागांची पाहणी करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले होते.
कोणत्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, उपअभियंता कल्याण भोसले, कनिष्ठ अभियंता विजय नागरे आणि योगेश राणे यांनी सिंदखेडराजाला भेट दिली. प्रस्तावित कामांच्या जागांची पाहणी करून उपलब्ध क्षेत्र, आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठीच्या सोयी-सुविधा आणि विकासकामांचा प्राधान्यक्रम यांचा आढावा घेण्यात आला. जिजाऊंच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच येथील पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध विकास करणे, हा या आराखड्यामागचा उद्देश आहे. पर्यटकांसाठी सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढू शकतात. आमदार कायंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा विषय प्रत्यक्ष पाहणीपर्यंत पोहोचला असून, प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply