मातृत्व ही जगातील सर्वांत मोठी शक्ती मानली जाते. गरोदरपणात शरीरात होणारे बदल, थकवा आणि अस्वस्थता यामुळे अनेक महिला धावणे तर दूरच, साधे चालणेही कमी करतात. मात्र अमेरिकेतील एका महिलेने या सगळ्या अडचणींवर मात करत गरोदरपणात तब्बल सात मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. तिची ही कामगिरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
डिअर्ड्रे कीन असे या ३८ वर्षीय महिलेचे नाव आहे. त्या न्यूयॉर्कमध्ये राहतात आणि नर्स प्रॅक्टिशनर तसेच मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतात. धावणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. गरोदर राहण्यापूर्वी त्यांनी ६० हून अधिक मॅरेथॉन पूर्ण केल्या होत्या. २०२६ मध्ये त्यांनी जगभरातील सात मॅरेथॉन धावण्याचे ठरवले होते.
गरोदरपणाची जाणीव धावतानाच झाली
बोस्टन आणि लंडन मॅरेथॉनदरम्यान आपला धावण्याचा वेग कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गरोदरपणाची चाचणी केली आणि ती सकारात्मक आली. मात्र त्यांनी ठरवलेल्या मॅरेथॉन पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला. धावण्याचा वेग कमी ठेवणे, गरज पडल्यास चालणे, पुरेसे पाणी पिणे आणि योग्य आहार घेणे याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.
२५ आठवड्यांच्या गरोदरपणात त्यांनी न्यूयॉर्क मॅरेथॉन ४ तास ६ मिनिटे ५५ सेकंदांत पूर्ण केली. ३४ आठवड्यांची गरोदर असतानाही त्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या आणि चार तासांपेक्षा थोड्या अधिक वेळात शर्यत पूर्ण केली. हळूहळू आठ महिन्यांपर्यंत त्यांनी ठरवलेल्या सातही मॅरेथॉन पूर्ण केल्या. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पतीची मोठी साथ लाभली, तर मित्रमंडळींनीही त्यांना सतत प्रोत्साहन दिले.
वडिलांकडून मिळाली धावण्याची प्रेरणा
डिअर्ड्रे यांना धावण्याची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील जॉन यांनाही धावण्याची आवड होती. मेंदूत गाठ असतानाही त्यांनी धावणे सुरू ठेवले होते. गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी त्यांनी न्यूयॉर्क मॅरेथॉन पूर्ण केली होती. आपल्या मुलालाही आयुष्यातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण द्यायची आहे, असे डिअर्ड्रे यांनी सांगितले.
Leave a Reply