बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी, वाढता मानसिक ताण आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाबाची सुरुवातीला अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. रक्तदाब दीर्घकाळ नियंत्रणाबाहेर राहिल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. मात्र, दैनंदिन जीवनशैलीत काही बदल केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
आहार, व्यायाम आणि वजन नियंत्रण
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पापड, लोणचे, चिप्स, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त मीठ असलेले खाद्यपदार्थ कमी खावेत. आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखा व्यायाम करावा. नियमित शारीरिक हालचालींमुळे हृदय मजबूत राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. वाढलेले वजन उच्च रक्तदाबाचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
तणाव, झोप आणि धूम्रपान
सततचा मानसिक ताण रक्तदाबावर परिणाम करू शकतो. योग, ध्यान आणि दीर्घ श्वसनाचे व्यायाम केल्याने मन शांत राहण्यास मदत होते. दररोज सात ते नऊ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे धूम्रपान पूर्णपणे टाळावे. आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास नियमित तपासणी करावी. डॉक्टरांनी दिलेली औषधे स्वतःहून बंद करू नयेत. जीवनशैलीतील बदलांसोबत वैद्यकीय उपचार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Leave a Reply