राज्यात दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशीच स्थिती असून, करमाळा तालुक्यातील देवळाली येथील ऐतिहासिक विहिरीने तळ गाठला आहे. ही तीच विहीर आहे, जिची ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या गाजलेल्या दृश्यात झलक पाहायला मिळाली होती.
१९६५ च्या दुष्काळात बांधलेली विहीर
१९६५ च्या भीषण दुष्काळाच्या काळात बांधण्यात आलेल्या या विहिरीत यंदा प्रथमच पाणी नसल्याचे समोर आले आहे. एकेकाळी शेतातील पिकांसह माणसे आणि जनावरांची तहान भागवणारी ही विहीर आज दुष्काळाच्या भयावह वास्तवाचे प्रतीक बनली आहे. गेल्या अनेक दशकांपासून परिसरातील शेतकऱ्यांना या विहिरीचा मोठा आधार होता. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही तिचा वापर होत होता. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि पाणी उपलब्धतेवर संकट निर्माण झाल्याने विहिरीने तळ गाठला असून, पाण्यासाठी आता पर्यायी स्रोत शोधण्याची वेळ आली आहे.
चित्रपटामुळे मिळालेली प्रसिद्धी
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे या विहिरीला राज्यभर प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटातील आर्ची आणि परश्याची पायऱ्यांवर झालेली नजरानजर तसेच विहिरीच्या कठड्यावरून उड्या मारून पोहण्याची दृश्ये याच ठिकाणी चित्रित करण्यात आली होती. चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर ही विहीर सिनेमाप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण बनली. १९६५ च्या दुष्काळात उभारलेली ही विहीर आज पुन्हा दुष्काळाच्या विळख्यात सापडली आहे. पडद्यावर प्रेमकथेचा अविस्मरणीय प्रसंग जपणारी ही विहीर आज मात्र पाण्याअभावी कोरडी पडली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नद्या आणि नाले कोरडे पडले आहेत, विहिरींनी तळ गाठला आहे आणि बोअरवेलही कोरड्या पडल्या आहेत. अनेक भागांत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
Leave a Reply