दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शक आणि अभिनेता मिस्किन यांनी तिला स्पर्श केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी मिस्किन यांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले. काहींनी तर कीर्तीच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत असल्याचा दावाही केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर आता कीर्तीने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
कीर्ती सुरेश आणि दिग्दर्शक मिस्किन लवकरच ‘सत्यवान सावित्री’ या चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मिस्किन यांनी कीर्तीच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं. कीर्तीने ‘डोरोथी’ या चित्रपटात केलेल्या अभिनयाने आपण प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर त्यांनी कीर्तीला सोन्याची भेटवस्तूही दिली. तिच्या कामाचं कौतुक करताना त्यांनी तिच्या गुडघ्याजवळ आणि कपाळाला स्पर्श केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी मिस्किन यांच्या कृतीवर आक्षेप घेतला. तर काहींनी कीर्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ती अस्वस्थ असल्याचा दावा केला. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.
कीर्ती सुरेशने ट्रोलर्सना सुनावलं
या प्रकरणावर अखेर कीर्ती सुरेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिने सांगितलं की, तिचं आणि मिस्किन यांचं नातं वडील आणि मुलीप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चुकीचा अर्थ काढणं योग्य नाही.
कीर्ती म्हणाली, “सर्वात आधी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला अस्वस्थता कुठे दिसली? कार्यक्रमात मी आणि मिस्किन दोघांनीही आमचं नातं वडील आणि मुलीसारखं असल्याचं सांगितलं होतं. ते तुम्ही ऐकलं नाही का?” पुढे तिने ट्रोल करणाऱ्यांच्या विचारांवरही प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली, “समजा मी अस्वस्थ होते, तरीही तुम्ही असं म्हणत आहात का की चित्रपटांमध्ये आम्हाला सहकलाकार स्पर्श करतात, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणीही अशा स्पर्शाबाबत आम्ही सहज असायला हवं? तुम्हाला काही गोष्टी योग्य पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे.”
कीर्तीच्या या उत्तरानंतर संबंधित नेटकऱ्याने आपली पोस्ट डिलीट केली आणि अभिनेत्रीची माफीही मागितली. आपला कोणताही वाईट हेतू नव्हता, व्हिडीओ व्हायरल होत असल्याने आपण ती पोस्ट केल्याचं त्याने स्पष्ट केलं.
‘सत्यवान सावित्री’ चित्रपटातून पुन्हा चर्चेत
कीर्ती सुरेश सध्या तिच्या आगामी ‘सत्यवान सावित्री’ या कोर्टरूम ड्रामामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती वकिलाची भूमिका साकारणार असून मिस्किन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला.
Leave a Reply