छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वांगी परिसरात घडलेल्या एका घटनेत पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत पडलेल्या रानडुकरांच्या संपूर्ण कळपाला वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. पहाटे तीन वाजता सुरू झालेली ही बचावमोहीम सकाळी नऊ वाजता यशस्वी झाली. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कळपातील एकाही प्राण्याला इजा न होता सर्व रानडुकरांची सुटका करण्यात आली.
वांगी परिसरातील एका शेतकऱ्याला विहिरीत रानडुकरे पडल्याचे लक्षात आले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रानडुकरांचे संपूर्ण कुटुंब जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होते. शेतकऱ्याने तत्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाला घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी मॅनविथइंडीज फाउंडेशनच्या सुसज्ज वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधला आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
पहाटे तीन वाजता सुरू झाली बचावमोहीम
माहिती मिळताच बचाव पथकाने आवश्यक साहित्य आणि उपकरणांसह घटनास्थळी धाव घेतली. खोल विहीर, पाण्याची पातळी आणि रानडुकरांची सतत सुरू असलेली धडपड यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र योग्य नियोजन, सुरक्षित बचाव तंत्र आणि वनविभाग व बचाव पथकातील समन्वयामुळे एकेक करून सर्व रानडुकरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या बचाव मोहिमेत मॅनविथइंडीज फाउंडेशनचे मनोज गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक तथा संस्थेचे संचालक आर्किटेक्ट आशिष जोशी, हर्ष केवारे यांच्यासह वनविभागाचे वनरक्षक साईनाथ पवार आणि विलास नरवाडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देऊन बचावकार्यासाठी सहकार्य करणाऱ्यांमध्ये भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल मुरकुटे, सरपंच कोंडीबा शेळके, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांडगे, लक्ष्मण मुरकुटे, रामू मुरकुटे, विकास मुरकुटे आणि सचिन मुरकुटे यांचा समावेश होता.
सर्व रानडुकरे सुखरूप; नैसर्गिक अधिवासात मुक्त
या मोहिमेत रानडुकरांच्या कळपातील एकाही प्राण्याची जीवितहानी झाली नाही. सर्व रानडुकरांची सुरक्षित सुटका करून आवश्यक निरीक्षणानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभाग आणि बचाव पथकाच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे रानडुकरांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवदान मिळाले.
Leave a Reply