महिला पोलीस भरतीसंदर्भात महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान जर तरुणींना मासिक पाळी आली तर अशा उमेदवारांना आरोग्य तपासणीनंतर ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली. या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरुणींना दिलासा मिळाला आहे.
चाचणीच्या दिवशीच अडचण का येते
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुणी वर्षभर प्रचंड मेहनत घेतात. पहाटे उठून सराव करणं आणि मैदानी चाचणीसाठी स्वतःला झोकून देणं, हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतं. मात्र ज्या खाकी वर्दीचं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे, ती मिळवण्याच्या दिवशीच जर मासिक पाळी आली तर वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरतं आणि भरतीची संधी वाया जाते. मासिक पाळीच्या काळात अनेक तरुणींना हातापायात गोळे येणं, तीव्र पोटदुखी, चक्कर आणि अशक्तपणा याचा त्रास होतो. अशा वेळी १०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याची चाचणी, गोळाफेक तसेच लांबउडी यांसारख्या शारीरिक चाचण्या देताना अडचणी येतात. अनेक तरुणींमध्ये मासिक पाळी येण्याची धास्ती असते आणि त्यामुळे त्यांना भरतीची संधी गमावण्याचं टेन्शन असतं. या गोष्टींचा विचार करून आता राज्य सरकारने पोलीस भरतीतील तरुणींच्या शारीरिक चाचणीच्या वेळी जर मासिक पाळी आली असेल तर त्यांच्या मैदानी चाचण्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदतवाढ त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर दिली जाणार आहे.
निर्णयाचं स्वागत
सरकारच्या या निर्णयाचं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणींनी स्वागत केलं आहे. मासिक पाळीमुळे चाचणीच्या दिवशी अपेक्षित कामगिरी करता येत नाही, त्यामुळे या निर्णयामुळे आता संधी हुकणार नाही, अशी भावना तरुणींनी व्यक्त केली आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेमुळे पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
Leave a Reply