बीड जिल्ह्याचे राजकारण नेहमीच चर्चेत असते. लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक, येथील लढत चुरशीचीच होते आणि नेतेमंडळी निवडणुकीआधीच तयारीला लागतात. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून आमदार विजयसिंह पंडित बीडच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहेत. आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमुळे बीड शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बॅनरवर नेमके काय लिहिले आहे?
विजयसिंह पंडित हे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभेचे आमदार असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील वजनदार नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात शुभेच्छा देणारे शेकडो बॅनर आणि मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यातील काही बॅनरवर शुभेच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभा असा उल्लेख आहे. बीड विधानसभेचे कार्यकर्ते पंडित यांना शुभेच्छा देत असल्याने नेमके काय घडते आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
मतदारसंघ बदलणार का?
पंडित हे गेवराई मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र बीडमध्ये लागलेल्या बॅनरचा अर्थ वेगळाच काढला जात आहे. ते आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदारसंघ बदलणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. ते बीड मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. त्यामुळेच सध्या समोर आलेल्या बॅनरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दुष्काळ असल्याने आणि अजित दादांच्या निधनाचे दुःख आजही मनात असल्याने वाढदिवसानिमित्त बॅनर लावू नयेत आणि उत्सवी कार्यक्रम घेऊ नयेत, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. २०२४ सालच्या निवडणुकीत पंडित यांनी गेवराई मतदारसंघातून शिवसेना (यूबीटी) चे उमेदवार बदामराव लहुराव पंडीत यांचा दारुण पराभव केला होता.
Leave a Reply