नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याला अखेर दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी याबाबतचे निर्देश दिले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची एकूण संख्या १४ वर पोहोचली आहे. मात्र, दिंडोरीला दिलासा मिळत असतानाच नाशिक तालुक्याचा समावेश पुन्हा एकदा रखडल्याने तेथील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
मुंबईतील मंत्रालयात महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या दुष्काळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत दिंडोरीसह पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली. दिंडोरीचा समावेश झाल्याने तालुक्यात दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने विविध १२ उपाययोजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र, दिंडोरीचा समावेश करण्यात आला असताना नाशिक तालुका पुन्हा वगळण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
पुढील पावले काय?
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून उपाययोजनांना गती देण्यासाठी पालकसचिवांनी अधिवेशनापूर्वी सर्व जिल्ह्यांना भेटी द्याव्यात, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. या दौऱ्यात दुष्काळाच्या सर्व निकषांनुसार परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन अहवाल मुख्य सचिवांकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
पाणीटंचाई निवारणासाठीच्या दहा उपाययोजनांबाबतचा निर्णय दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडील उपलब्ध निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घ्यावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Leave a Reply