इराण आणि आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय खलाशी असलेल्या एलपीजी टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. या घटनेमुळे भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पनामाचा ध्वज असलेल्या ‘तारा गॅस’ या जहाजावर 24 भारतीयांसह 25 जणांचा कर्मचारीवर्ग होता. सुरुवातीला सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा हल्ला झाल्याने जहाजावरील कर्मचाऱ्यांना बाहेर पडावं लागलं आणि एक भारतीय खलाशी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.
बेपत्ता खलाशाचा शोध सुरू
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडियावरून या घटनेची माहिती दिली आहे. बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय सुरू असून सर्वांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेल्या 24 तासांत चार जहाजांचं नुकसान
ही घटना अशावेळी घडली आहे, जेव्हा होर्मुझच्या सामुद्रधुनीत आणि आसपासच्या सागरी सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास चार तेलवाहू जहाजांचं नुकसान झाल्याचीही माहिती आहे. इराणच्या नौदलाने सांगितलं की, पूर्वेकडील भागात आणखी एका तेलवाहू जहाजाला आग लागली. त्या जहाजावर त्यांनी आरोप केला की, ते प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवास करत होतं आणि त्याची दिशादर्शन प्रणालीही काम करत नव्हती, त्यामुळे त्याला नौदल कारवाईचा फटका बसला.
इराणने त्याचवेळी सर्व इतर जहाजांनाही इशारा दिला आहे. इराणशी संपर्क साधल्याशिवाय कोणीही प्रतिबंधित सागरी भागात प्रवेश करू नये, असं ठणकावण्यात आलं आहे. नियम डावलल्यास गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले होतील, असा इशाराही देण्यात आल्याचं अहवालांत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता सुरक्षा आणि दक्षता वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, युके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन एजन्सीने माहिती दिली आहे की, ओमानपासून सुमारे 7 सागरी मैल अंतरावर हा हल्ला झाला. सुदैवाने कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झालेली नाही आणि ते सर्व सुरक्षित आहेत, असं एजन्सीने म्हटलं आहे. जहाजाच्या नुकसानीबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.
Leave a Reply