महायुतीतील दोन घटक पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. रायगड जिल्ह्यात आता शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे.
शिंदेसेनेचे अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
बैलमारे यांचं सडेतोड प्रत्युत्तर
रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अॅड. संतोष बैलमारे यांनी आमदार दळवी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दळवी यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. तटकरे यांच्यावर वारंवार केली जाणारी टीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली असून, त्यामुळेच पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
महिला आघाडीकडूनही निषेध
खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा संजीवनी पिंगळे यांनीही आमदार दळवी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. एकीकडे दळवी यांच्याकडून तटकरे यांच्यावर टीकेची झोड सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्युत्तरांची सरबत्ती सुरू झाली आहे.
या घडामोडींमुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी काळात हा वाद आणखी चिघळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Leave a Reply