वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर वाकण नाका ते एकविरा हॉटेल या टप्प्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. चहा-पाण्यासाठी थांबणारी वाहने आणि रस्त्याची खराब अवस्था यामुळे येथे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी प्रवासी आणि वाहनचालक हैराण झाले असून, अपघातांचाही धोका वाढला आहे.
कोकणाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग
कोकणात जाण्यासाठी तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर पर्यटक आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र वाकण नाक्यापासून एकविरा हॉटेलपर्यंत ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत असून, वाहनांचा वेग मंदावत आहे. परिणामी काही वेळातच वाहतुकीचा खोळंबा होतो.
वाकण नाक्यावर कोकणात जाणारे आणि येणारे प्रवासी चहा-पाणी तसेच विश्रांतीसाठी वाहने थांबवतात. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होतो. त्यातच मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखी कमी होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
दुरुस्तीची प्रतीक्षा
अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले होते. मात्र इतक्या कमी कालावधीत रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने वाकण नाका ते एकविरा हॉटेलदरम्यानचे खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Leave a Reply