मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात वनमजुरांचे बेमुदत उपोषण सुरू

नंदुरबार वन विभागातील रोजंदारी मजुरांनी थकीत वेतनातील पन्नास टक्के कपातीच्या निषेधार्थ धुळ्यातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

धुळ्यात वनमजुरांचे बेमुदत उपोषण सुरू

धुळे जिल्ह्यात वन विभागातील रोजंदारी मजुरांच्या प्रश्नावरून सोमवारपासून उपोषण सुरू झाले आहे. नंदुरबार वन विभागातील मजुरांनी थकीत वेतनातून पन्नास टक्के रक्कम कापल्याचा निषेध करत धुळ्यातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य वन व सामाजिक वनीकरण कामगार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झाले आहे.

नंदुरबार प्रादेशिक वनक्षेत्र, चिंचपाडा प्रादेशिक वनक्षेत्र आणि नवापूर प्रादेशिक वनक्षेत्रातील रोजंदारी मजुरांचे गेल्या आठ ते दहा महिन्यांचे वेतन थकलेले आहे. रोपेवन खर्चात कपात करण्याच्या कारणावरून शासनाच्या १३ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून मजुरांच्या थकीत वेतनातून पन्नास टक्के रक्कम कापली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गरीब आणि अल्पशिक्षित आदिवासी मजुरांवर यामुळे आर्थिक अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

पूर्वसूचना देऊनही दखल नाही

या प्रश्नांबाबत १ ऑक्टोबरला वन विभागातील संबंधित अधिकारी, वनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, दीड महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर मजुरांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला, असे संघर्ष समितीने म्हटले आहे.

मजुरांच्या प्रमुख मागण्या

मजुरांचे संपूर्ण थकीत वेतन कोणतीही कपात न करता अदा करावे, तोंडी आदेशाने कामावरून कमी केलेल्या मजुरांना तातडीने पुन्हा कामावर घ्यावे, २००४ ते २०२४ या कालावधीतील मजुरांची एक हजार दिवसांच्या कामाची परिपूर्ण माहिती तयार करून कायम सेवेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मजुरांना वर्षभर काम उपलब्ध करून द्यावे आणि नवापूर सामाजिक वनीकरण क्षेत्रातील जून २०२६ पासूनचे थकीत वेतन अदा करावे, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत.

उपोषणात विज्या वळवी, मुवाशा वळवी, दाज्या वसावे, कांती वसावे, जालमसिंग वसावे, रतन सोनवणे, रामसिंग पावरा, अनिल गावित आणि बाळकृष्ण गावित हे मजूर सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बैसाणे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रमणी वाघ यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास मोरे यांच्यासह उपोषणकर्त्या मजुरांनी दिला आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance