नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रायपाडा येथे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सात महिन्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचा अहवाल मागविला आहे.
दोन तासांचा विलंब
रायपाडा येथील अनिता ईरते या सुमारे सात महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना पोटात त्रास जाणवू लागल्याने मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. खोडाळा आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उभी असतानाही ती उपलब्ध करून देण्यास आरोग्य अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचा आरोप वसंत ईरते यांनी केला आहे. त्यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले, मात्र ती पोहोचण्यास तब्बल दोन तासांचा विलंब झाला. या विलंबादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाला.
अहवालानंतर कार्यवाही
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा आणि आपत्कालीन रुग्णवाहिका व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मोखाडा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देसले यांनी सांगितले की, अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनेचा उलगडा होईल आणि त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल.
Leave a Reply