नांदगाव शहरातील मालेगाव रस्त्यावर सुरू असलेल्या केबल टाकण्याच्या कामामुळे मुख्य जलवाहिनी फुटली असून, शहराचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून विस्कळीत झाला आहे. रविवारी दुरुस्ती केल्यानंतर सोमवारी पुन्हा जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे कामही अडचणीत आले आहे.
परवानगीविना खोदकाम, मॅपिंगही नाही
टेलिफोन कंपनीकडून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र, काम सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा पाणीपुरवठा विभागाची परवानगी घेतली गेली नाही. तसेच जमिनीखालील जलवाहिन्या आणि इतर सुविधांचे मॅपिंगही करण्यात आले नव्हते. त्यामुळे खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनीला धक्का लागून ती नादुरुस्त झाली.
दुरुस्तीतही अडथळे
एका ठिकाणची गळती शोधून दुरुस्त केली की दुसऱ्या ठिकाणी पुन्हा गळती सुरू होते. त्यामुळे देखभाल व दुरुस्ती पथकाची दमछाक होत आहे. शिवाय जलवाहिनीवरील अतिक्रमणामुळे दुरुस्तीसमोरही पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीला विलंब होण्याची शक्यता असून, नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा वाढणार आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीची जबाबदारी निश्चित करावी, जलवाहिनीची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी मालेगाव रस्त्यावरील रहिवाशांकडून होत आहे.
Leave a Reply