पाकिस्तान दौरा हा सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा दौरा मानला जातो. याच दौऱ्यापासून सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीबद्दल चर्चा सुरू झाली की, पाकिस्तान दौऱ्याच्या आठवणी हमखास सांगितल्या जातात. त्या दौऱ्यात सचिन किती मोठा खेळाडू होणार आहे, याची झलक दिसली होती.
कादिर यांचे आव्हान आणि लागोपाठ षटकार
पाकिस्तान दौऱ्यात पेशावर येथील प्रदर्शनीय सामन्यात सचिनने पाकिस्तानचे महान लेगस्पिनर अब्दुल कादिर यांना लागोपाठ षटकार मारले होते. भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या होती. मुश्ताक अहमद यांना काही षटकार मारल्यानंतर अब्दुल कादिर यांनी सचिनला त्यांच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचे आव्हान दिले. त्यावेळी सचिनने कादिर यांच्या गोलंदाजीवर लागोपाठ षटकार मारले. हा प्रसंग आजही चाहत्यांच्या चांगलाच लक्षात आहे आणि कादिर यांना मारलेल्या षटकारांसाठी सचिनची आठवण काढली जाते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयात सचिनसाठी बॅटोग्राफी या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. हा विभाग खास सचिन तेंडुलकरला समर्पित आहे. त्यावेळी सचिन बोलत होता. पेशावरमध्ये प्रदर्शनीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांसमोर केलेल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, असे सचिन म्हणाला.
५७ धावांची खेळी अधिक महत्त्वाची
पण सचिनसाठी या प्रदर्शनापेक्षा चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केलेली खेळी जास्त महत्त्वाची आहे. त्यावेळी ३४ धावांवर भारताच्या चार विकेट गेल्या होत्या. पण सचिनने ५७ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताला तो कसोटी सामना वाचवता आला. सचिनला सुद्धा अब्दुल कादिर यांना मारलेल्या षटकारांपेक्षा ही खेळी जास्त महत्त्वाची वाटते. आजही माझ्या कारकिर्दीतील ती एक महत्त्वाची खेळी आहे, असे सचिन म्हणाला.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतील त्या खेळीला म्हणावे तेवढे महत्त्व दिले गेले नाही, याचे सचिनलाही आश्चर्य वाटते. सोळा वर्षांच्या सचिनने त्यावेळी इम्रान, वकार, अक्रम आणि अब्दुल कादिर यांच्या तोफखान्याचा सामना केला होता.
Leave a Reply