ओझरजवळील म्हाळसाकोरे येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरचे लोकार्पण आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाले. या ट्रान्स्फॉर्मरमुळे गोदाकाठ परिसरातील आठ गावांतील वीज समस्येला मोठा दिलासा मिळणार असून, शेतीपंपांसाठी सलग आठ तास वीजपुरवठा सुरू होणार आहे.
आठ गावांना फायदा
म्हाळसाकोरे, मांजरगाव, खानगाव थडी, तारुखेडले, तामसवाडी, करंजी, ब्राह्मणवाडे आणि भुसे या आठ गावांतील वीजपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. गोदाकाठ परिसरात शेतीसाठी विजेची मागणी वाढत असल्याने आमदार बनकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांच्याशी चर्चा केली होती आणि शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास नेले.
मंगळवारपासून आठ तास वीज
महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांनी सांगितले की, मंगळवारपासून (१७ नोव्हेंबर) शेतकऱ्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सलग आठ तास अखंडित वीजपुरवठा देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या वीजविषयक समस्या असल्यास त्या तातडीने सोडवण्यात येतील. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता अनिल शेतकरी, ओझर उपविभागाचे कार्यकारी अभियंता संदीप शिंदे उपस्थित होते. आमदार बनकर म्हणाले की, निवडणुका संपल्यानंतर कोणताही गट किंवा पक्ष न मानता सर्वसामान्य जनतेच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. कार्यक्रमानंतर त्यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या दहा गेटच्या कामाची पाहणी केली. धरणाच्या उजव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध असून, ते काम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
Leave a Reply