अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर साडे नऊ महिने उलटूनही या प्रकरणात तपास झालेला नाही, असा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल पुन्हा प्रेझेन्टेशनद्वारे या प्रकरणातील संशयितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत तर नाहीत, असा सवाल केला आहे. त्यानंतर भाजपाचे नेते रोहित पवार यांच्यावर तुटून पडले आहेत. आता भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी अजित पवार यांच्या मृत्यूमागचे रोहित पवारच सूत्रधार नाहीत ना, असा सवाल करत त्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
फरांदे यांची टीका
भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार ज्या पद्धतीने अजित पवार गेल्यानंतर वागले आहेत, त्यावरून त्यांचीच चौकशी करायला हवी, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे. आपण स्वतः रोहित पवार यांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असेही देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांना त्यांचे काका अजित पवार यांची जागा घेण्याची घाई झाली आहे. त्यासाठी ते सतत असे वागत आहेत, म्हणून त्यांचा असा आटापिटा सुरू आहे, अशी टीका फरांदे यांनी केली. मात्र राजकारणात जनता जागा देत असते, कोणाला ती घेता येत नाही, असेही फरांदे म्हणाल्या.
रोहित पवार यांचा आरोप काय?
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा विमान अपघात झाला, त्या विमान कंपनीच्या मालकाची चौकशी केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित केला आहे. व्हीएसआर विमान कंपनी आणि त्याचा मालक व्ही. के. सिंग यांना वाचवण्यामागे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे फडणवीस आहेत, असे आपण म्हणत नाही. मात्र, विमान कंपनी मालकाविरोधात एफआयआर नोंद होत नाही. त्याला वाचवले जात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस कंपनीच्या मालकाच्या मुलांच्या लग्नात उपस्थित होते. त्यांचे चांगले संबंध असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
Leave a Reply