वयाची साठी ओलांडल्यानंतरही तंदुरुस्ती टिकवून ठेवणं सोपं नसतं. मात्र काही मंडळी शिस्तबद्ध दिनचर्येच्या जोरावर हे सहज साध्य करतात. नीता अंबानी यांचं नाव अशाच व्यक्तींमध्ये घेतलं जातं. त्या ६३ वर्षांच्या आहेत, पण त्यांची तब्येत आणि उत्साह पाहून हे वय लक्षातही येत नाही. मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत.
पहाटे चार वाजताच सुरू होणारा दिवस
त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो. सकाळीच परदेशातील कंपन्यांसोबत बैठका पार पाडाव्या लागतात. इतक्या व्यस्त वेळापत्रकातही व्यायामासाठी वेळ काढणं त्यांनी कधी सोडलेलं नाही. शरीर तंदुरुस्त असेल तर मन शांत राहतं, असं त्यांचं मत आहे. आठवड्यातून पाच ते सहा दिवस त्या व्यायाम करतात आणि दररोज वेगळा व्यायाम असतो. योगासनंही त्यांच्या दिनचर्येचा भाग आहेत. त्याशिवाय पोहणं आणि नृत्य यांसारखे व्यायामही त्या करतात. दिवसभरात हजारो पावले चालण्याचं लक्ष्य त्या ठेवतात.
आहारात साधेपणा आणि शिस्त
आहारात त्या साध्या जेवणाला प्राधान्य देतात. तंतुमय पदार्थ आणि प्रथिनं यांच्यावर भर असतो. नाश्त्याला अंडी, सुकामेवा आणि बीटचा रस घेतला जातो. दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि सूप असतं, तर रात्री गुजराती जेवण घेतलं जातं. त्या भरपूर पाणी पितात. साखर त्यांनी पूर्णपणे बंद केली आहे. जंक फूडला त्या हातही लावत नाहीत. जंक फूड खाऊन तंदुरुस्त राहणं शक्य नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. कधीतरी भेळ खाण्याची आवड त्यांना आहे. सकाळी जमल्यास जीम केली जाते, नाहीतर चालण्यावर अधिक भर दिला जातो. मोजकं आणि आरोग्यदायी खाणं, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्या हेच त्यांच्या तंदुरुस्तीचं गमक मानलं जातं.
Leave a Reply