दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात छठ पूजा उत्साहात साजरी झाली. मात्र, महाराष्ट्रात, खासकरून मुंबईत, छठ पूजेवरून राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या वादात खेचण्याचा प्रयत्न झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र संयमाची भूमिका घेतली. तरीही त्यांच्यावर टीका करण्यात आली. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी छठ पूजेच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
शुक्ला यांनी काय म्हटले
सुनील शुक्ला म्हणाले की, एक वर्षापूर्वी राज ठाकरे बोलले होते की, ज्याला मराठी बोलता येत नाही, त्याच्या कानाखाली मारा. त्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यांच्याविरोधात खटला दाखल केल्याचे शुक्ला यांनी सांगितले. आपला समाज मार खाण्यासाठी इथे आलेला नाही, असे ते म्हणाले.
इथे कोणीही उत्तर भारतीयांवर भारी पडण्याचा प्रयत्न केला, तर आपण मध्ये उभे राहू, असे शुक्ला यांनी ठणकावले. हा समाज झुकणार नाही, असेही ते म्हणाले. इथे कायमस्वरूपी राहणाऱ्या लोकांना त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. पुढे संघर्ष अधिक वाढणार असल्याचे सांगत एकजुटीने ताकद दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेची भूमिका काय असते, हे लवकरच समजेल.
चांदिवलीत छठपूजा उत्साहात साजरी
चांदिवली विधानसभेत छठपूजा उत्साहात साजरी झाली. आमदार दिलीप मामा लांडे उत्तर भारतीय पेहरावात दिसले, याची चर्चा झाली. शितल तलाव येथे छठपूजेनिमित्त मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधव एकत्र येऊन छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदू धर्मातील परंपरा आणि संस्कृतीनुसार दरवर्षी रामनवमी, कावड यात्रा आणि छठपूजा हे सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असल्याची प्रतिक्रिया दिलीप मामा लांडे यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना नेते संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटतर्फे जुहू चौपाटीवर २९ व्या भव्य छठपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि टेलिव्हिजन होस्ट शेखर सुमन यांना कला आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बिहार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बिहारमध्ये आलेल्या भीषण पुराच्या काळात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणारे प्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवक सोनू सूद यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
Leave a Reply