सध्या सोशल मीडियावर झोपताना ओठांवर पट्टी लावण्याची पद्धत मोठ्या चर्चेत आहे. या पद्धतीला माउथ टेपिंग असे म्हटले जाते. रात्री झोपताना तोंडावर पट्टी लावल्यास घोरणे कमी होते, नाकाने श्वास घेण्याची सवय लागते आणि गाढ झोप लागते, असा दावा या ट्रेंडच्या समर्थकांकडून केला जात आहे. ऐकायला हा उपाय सोपा वाटतो, मात्र वैद्यकीय दृष्टिकोनातून यामागील सत्य काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
तोंडाने श्वास घेण्यापेक्षा नाकाने श्वास घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. याच तत्त्वावर ही पट्टी वापरली जाते. मात्र, या दाव्यांना पाठिंबा देणारे वैज्ञानिक पुरावे अजूनही फारच मर्यादित आहेत. या विषयावर झालेले संशोधन लहान गटांपुरतेच मर्यादित असून त्यावरून सरसकट निष्कर्ष काढता येत नाहीत.
संशोधन काय सांगते?
सौम्य अडथळ्याच्या झोपेतील श्वासरोधाचा त्रास असलेल्या २० रुग्णांवरील एका प्राथमिक अभ्यासात आणि तोंडाने श्वास घेणाऱ्या ३० रुग्णांवरील दुसऱ्या अभ्यासात पट्टी लावल्याने घोरणे व श्वासातील अडथळे काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, हे दोन्ही अभ्यास विशिष्ट रुग्णांपुरतेच मर्यादित होते. नुकत्याच झालेल्या एका सर्वंकष आढाव्यातून असा निष्कर्ष निघाला आहे की, घोरण्यावर किंवा झोपेतील श्वासरोधावर माउथ टेपिंग हा विश्वासार्ह किंवा प्रभावी उपाय आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
तोंडाने श्वास घेणे ही केवळ सवय नसते
तोंडाने श्वास घेणे ही नेहमीच केवळ वाईट सवय नसते. नाकात किंवा घशाच्या वरच्या भागात अडथळा निर्माण झाल्यास शरीराला पुरेसा प्राणवायू मिळवण्यासाठी तोंड उघडे ठेवून श्वास घ्यावा लागतो. नाकाचे हाड वाकडे असणे, अॅलर्जी किंवा नाकाचे इतर आजार यामुळे नाकाने श्वास घेणे कठीण होते. लहान मुलांमध्ये टॉन्सिल्स किंवा अॅडेनॉईड्स वाढल्यामुळे श्वासमार्ग अडकतो. मोठ्या व्यक्तींमध्ये वजन वाढणे, झोपेतील श्वासरोध, श्वासमार्गाची रचना अरुंद असणे किंवा मज्जासंस्थेशी संबंधित समस्या यामुळे ही अडचण निर्माण होते. तोंडावर पट्टी लावल्याने हा मूळ अडथळा दूर होत नाही.
संभाव्य धोके कोणते?
तोंडाने श्वास का घेतला जात आहे याचे मूळ कारण न जाणता पट्टी लावणे धोकादायक ठरू शकते. नाक आधीच बंद असेल तर तोंड पट्टीने बंद केल्यामुळे श्वास घेणे अधिक कठीण होऊ शकते आणि गुदमरल्यासारखे वाटू शकते. घशात विशिष्ट प्रकारचा अडथळा असलेल्या रुग्णांमध्ये तोंड बंद केल्याने हवेचा प्रवाह अधिकच बिघडल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास, अचानक भीती किंवा अस्वस्थता, त्वचेवर जळजळ किंवा अॅलर्जी आणि झोपमोड होणे असे त्रास होऊ शकतात. सर्वात मोठा धोका म्हणजे पट्टीच्या वापरामुळे मूळ आजाराचे निदान आणि उपचार लांबणीवर पडतात.
मुलांबाबत विशेष काळजी घ्या
लहान मुलांच्या बाबतीत हा प्रयोग करणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. मुलांमध्ये सतत घोरणे किंवा तोंड उघडे ठेवून झोपणे हे वाढलेले टॉन्सिल्स, अॅडेनॉईड्स किंवा झोपेतील श्वासरोधाचे लक्षण असू शकते. तोंडावर पट्टी लावल्याने या गंभीर समस्यांवर उपचार होत नाही. सकाळी उठल्यावर सतत तोंड कोरडे पडणे, नाक बंद राहणे, सकाळी डोके दुखणे, खूप मोठ्याने घोरणे, झोपेत श्वास गुदमरणे किंवा अडकणे आणि दिवसभर अतिप्रमाणात थकवा जाणवणे ही लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
सुरक्षित मार्ग कोणता?
माउथ टेपिंग हा घोरण्यावर किंवा वाईट झोपेवर सिद्ध झालेला वैद्यकीय उपाय नाही. रुग्णाची लक्षणे पाहून नाक आणि घशाची तपासणी, वरच्या श्वासमार्गाचे मूल्यमापन आणि आवश्यक असल्यास झोपेचा अभ्यास करून मूळ कारणाचा शोध घेतला जातो. तोंडाने श्वास नक्की का घेतला जात आहे याचे अचूक कारण शोधून त्यावर योग्य उपचार करणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणताही ट्रेंड आंधळेपणाने न वापरता नाक, कान व घसा तज्ज्ञ किंवा झोपेच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितकारक ठरेल.
Leave a Reply