मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात बिबट्याचे दर्शन पुन्हा एकदा वाढले आहे. दिंडोशी परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याने तिथल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रहेजा सोसायटीच्या आसपास बिबट्या अनेकदा दिसून आल्यामुळे स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत. जीव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपरोधिक पोस्टर
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक वेगळा आणि उपरोधिक मार्ग निवडला आहे. त्यांनी एक पोस्टर तयार केले आहे. त्या पोस्टरवर लिहिले आहे की, आता बिबट्याला बघण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही, आता आपली भेट थेट गोरेगावमध्येच होणार. हे पोस्टर सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
परिसरात सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाने तातडीने कठोर पावले उचलून बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठीच नागरिकांनी हा अनोखा निषेध केल्याचे सांगण्यात येत आहे.
वनविभागाकडे गस्त आणि पिंजऱ्यांची मागणी
गोरेगाव पूर्वेकडील हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असल्यामुळे अनेकदा वन्यजीव नागरी वस्तीत येण्याच्या घटना घडतात. मात्र, वारंवार होणाऱ्या या दर्शनामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाला या परिसरात गस्त वाढवण्याचे आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावून सुरक्षित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. वनविभाग यावर काय पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply