बंगालच्या खाडीत सध्या हवामानात मोठा बदल झाला आहे. तेथे तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे १६ नोव्हेंबरला चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. हे चक्रीवादळ १७ नोव्हेंबरला रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असून त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १४५ किमीपर्यंत पोहोचेल. या चक्रीवादळाला अक्वान असे नाव देण्यात आले आहे.
अक्वान चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. वादळ किनाऱ्यावर धडकण्याआधीच समुद्राच्या लाटा रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, अंदमान आणि झारखंड या पाच राज्यांत इशारा जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रातून परत किनाऱ्यावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशात काय स्थिती राहणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आंध्र प्रदेशात १६ नोव्हेंबरला ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या खाडीतील कमी दाबाचे क्षेत्र खतरनाक चक्रीवादळात रूपांतरित होऊन किनाऱ्याच्या दिशेने सरकेल तेव्हा १९ ते २० नोव्हेंबर या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ७० किमी असा होणार आहे. या काळात झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
ओडिशा आणि तामिळनाडूत पावसाचा इशारा
ओडिशात पुढील काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १९ ते २१ नोव्हेंबर या काळात तेथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी राहण्याचा अंदाज आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तामिळनाडूतही चक्रीवादळाचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. १७ ते २० नोव्हेंबर या काळात तेथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. १८ आणि १९ नोव्हेंबरला काही भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असा राहील.
अंदमान आणि झारखंडमध्येही परिणाम
अक्वान चक्रीवादळाचा फटका अंदमानलाही बसणार आहे. तेथे १६ नोव्हेंबरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किमी राहील. १७ नोव्हेंबरला समुद्र प्रचंड खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
झारखंडमध्येही वातावरणात बदल होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० आणि २१ नोव्हेंबरला ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेगही जास्त राहण्याची शक्यता आहे.
Leave a Reply