अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई करताना दिसत आहेत. अन्न सुरक्षेचे नियम डावलल्यास तसेच नियम मोडल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे. पुणे शहरही यातून सुटलेले नाही. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या कारवायांना चांगलाच वेग आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली या दोन्ही हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. अनेक कंटेंट क्रिएटर्सने यावर रिल्सही बनवल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे यानेही याच कारवाईवर एक रिल तयार केली असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
रिलमध्ये काय आहे
अथर्व सुदामे पुणे शहरातील गमती-जमतींवर रिल्स तयार करतो. त्याच्या व्हिडीओंचा मोठा चाहतावर्ग आहे. वैशाली आणि रुपाली रेस्टॉरंट्सवर कारवाई होताच त्याने त्याच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये वैशाली आणि रुपाली नावाच्या दोन तरुणी दिसत आहेत. त्यांना अथर्व सुदामे काय वैशाली, रुपाली काय चाललंय असे विचारत आहे. त्यावर काही नाही, सगळं निवांत असे दोन तरुणी बोलत आहेत. यालाच उत्तर म्हणून चला मग वाडेश्वरला जाऊ, असे मिश्कीलपणे बोलताना तो दिसत आहे.
या रिलमधून अथर्वला असा मिश्कील संदेश द्यायचा आहे की वैशाली आणि रुपाली या दोन्ही हॉटेल्सना आता काही काम राहिले नाही. त्यांच्यावर कारवाई झाली आहे, त्यामुळे आता चला वाडेश्वर या रेस्टॉरंटला साऊथ इंडियन पदार्थ खायला जाऊ.
प्रतिक्रिया आणि चर्चा
अथर्वच्या या रिलवर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. जे लोक वैशाली आणि रुपाली हॉटेलचे फॅन आहेत, ते कधीच वाडेश्वरला जाऊन साऊथ इंडियन जेवण करत नाहीत, असे एका युजरने आपल्या कमेंटमध्ये सांगितले आहे. पुण्यातील इतरही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने वैशाली-रुपाली हॉटेलवर रिल्स केल्या आहेत.
वैशाली आणि रुपाली ही दोन्ही हॉटेल्स पुण्यात प्रसिद्ध आहेत. या हॉटेलमधील अन्नपदार्थ चविष्ट आणि रुचकर आहेत, असे नेहमी सांगितले जाते. परंतु या दोन्ही हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षेचे नियम पाळण्यात आले नाहीत. हॉटेलमध्ये तपासणी केली असता स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि उघड्यावर अन्नपदार्थांची चुकीच्या पद्धतीने साठवणूक अशा काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले.
Leave a Reply