जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ह.भ.प. दौलत सातपुते महाराज (वय ४१) मृतावस्थेत आढळले. रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेल्या महाराजांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं असून, त्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दौलत महाराज सातपुते हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील रहिवासी होते. मागील आठ ते दहा वर्षांपासून ते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे वास्तव्यास होते. गावातील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात ते राहत होते. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ते धार्मिक विचारांचा प्रसार करण्यासोबतच समाजप्रबोधनाचं कार्य करत होते. त्यांच्या कीर्तनातून अनेक विषयांवर भाष्य केलं जात होतं, त्यामुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांशी त्यांचा नियमित संपर्क होता.
रात्री कीर्तन, सकाळी धक्कादायक घटना
घटनेच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचं अवघडराव सावंगी गावात कीर्तन झालं होतं. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे मठात परतले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ होऊनही ते खोलीबाहेर आले नाहीत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना संशय आला. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं असता दौलत महाराज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दौलत महाराज यांनी टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून तपासानंतरच मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. रात्री गावात कीर्तन करून भाविकांना मार्गदर्शन करणारे दौलत महाराज दुसऱ्याच दिवशी सकाळी मठात मृतावस्थेत आढळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे अवघडराव सावंगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply