मधुमेहाचा धोका थेट चाळिशीनंतर उद्भवत नाही. त्याची सुरुवात २५ ते ३५ वयात होते. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे चाळीशीच्या आतच जीवनशैली सुधारणे गरजेचे असते. मधुमेहाचा धोका टाळायचा असेल, तर त्याची काळजी आधीच घेतली पाहिजे.
आहारात काय बदल करावेत
अनेकांच्या आहारात भात, मैदा आणि ब्रेडसारखे पदार्थ सहज दिसून येतात. मधुमेहाचा धोका टाळायचा असेल, तर आजपासूनच ब्राऊन राइसचा आहारात समावेश करण्यास विसरू नका. तसेच आहारात डाळ, पनीर, दही आणि अंडी यांसारख्या पदार्थांचाही समावेश करता येतो. हिरव्या पालेभाज्या, पेरू आणि पपईसारखी फळेही खाता येतात.
तुमच्या अर्ध्या ताटात सॅलड आणि भाजी असावी. त्यानंतर उरलेल्या भागात भाकरी आणि भाताचा समावेश करावा. जेवताना सावकाश जेवण करावे. जेवण करताना टीव्ही पाहणे किंवा मोबाईल फोनचा वापर करणे टाळावे.
जेवणाची पद्धत आणि वेळा
जेवताना आधी सॅलड, हिरव्या भाज्या, डाळ आणि पनीरसारखे प्रथिनयुक्त पदार्थ खावेत. त्यानंतर भात किंवा भाकरी खावी. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. फळांचा रस पिण्याऐवजी फळ खाणे फायदेशीर ठरते.
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळा पाळाव्यात. रात्री झोपण्याच्या दोन-तीन तास आधी जेवण करावे. जेवण केल्यानंतर १० मिनिटे चालावे. कोणताही उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत, हे लक्षात ठेवावे.
Leave a Reply